• 5 minutes ago
हिंगोली : नांदेड लगतच्या आलेगांव शिवारात एक ट्रॅक्टर विहिरीत पडून 7 महिलांचा (Women) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. हळद काढणीच्या कामासाठी या महिला ट्रॅक्टरमध्ये बसून कामावर जात असताना हा अपघात झाला. या विहिरीला कठडा नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शन सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाने देखील मदत व बचावकार्य सुरू केले. त्यामुळे, विहिरीत पडलेल्या 10 पैकी 3 महिलांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, एकाच गावातील 7 महिलांचा पाण्यात बुडून झाला. त्यामध्ये, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील दोन सुना पार्वती आणि सरस्वती यांनाही जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीमध्ये शेतमजूर राहत होते नेहमीप्रमाणे हे नागरिक शेतमजुरीचे काम करत असत आज सकाळी शेतातील कामानिमित्त ट्रॅक्टरमध्ये बसून हे मजूर जात होते. दरम्यान गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये हे ट्रॅक्टर पडल्याने कामगार महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. विहिरीतून एकूण सात मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आली असून तीन जणांना वाचवण्यात स्थानिक व प्रशासनाला यश आले आहे. 

या घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकाच गावातील 7 महिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. विशेष म्हणजे गावातील एका कुटुंबातील दोन सुना म्हणजेच सख्ख्या जावांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिलांना 2-5 वर्षांची लहान-लहान मुले आहेत. त्यामुळे, कोवळ्या वयातच काळाने मोठा सूड या चिमुकल्यांवर उगवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या 5 लाख रुपयांच्या मदतीने या कटुंबातील चिमुकल्यां आयुष्य तडीस जाईल का, हाच खरा प्रश्न आहे.

Category

🗞
News

Recommended