आंध्र प्रदेशचं राजकारण अचानक ढवळून निघालंय. मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मोठा धमाका करत अख्खं मंत्रिमंडळच बरखास्त केलंय. मंत्रिमंडळ बैठकीत सर्व २४ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. ११ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. त्यात एक-दोन जुने चेहरे वगळता सर्व नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असं सांगण्यात येतंय. जगनमोहन रेड्डींनी हा निर्णय घेण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी दिलेला शब्द... जगनमोहन रेड्डींचा तो शब्द आणि आंध्रातली घडामोड सविस्तर या व्हिडीओतून समजून घेऊ.. मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. ही विजयी घोडदौड २०२४ मध्येही कायम ठेवण्यासाठी जगन रेड्डी यांनी आतापासूनच कंबर कसलीय. त्याचाच भाग म्हणून मंत्रिमंडळात फेरबदल करायचा, आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची, असा निर्णय त्यांनी घेतल्याचं बोललं जातं. जगनमोहन रेड्डी यांनी याबाबत आधीच संकेत दिले होते. पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर टीम बदलली जाईल, असा शब्दच त्यांनी दिला होता. त्यानुसार डिसेंबर २०२१ मध्येच हे बदल होणार होते, मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालट लांबणीवर पडली.
Category
🗞
News