शेती क्षेत्रात शेतकऱ्यानेच लावला नव्या सोयाबीन वाणाचा शोध

Maharashtra Times

by Maharashtra Times

89 views
चंद्रपूरचे प्रगतीशील शेतकरी सुरेश गरमडे यांनी सोयाबीनच्या एका नव्या वाणाचा शोध लावत दशकभर प्रयत्न करून त्याचे स्वामित्व हक्क मिळविले आहेत. शेती क्षेत्रात शेतकऱ्यानेच केलेले हे संशोधन अनोखे ठरले असून रोगराईला बळी न पडणारी व भरघोस उत्पन्न देणारी एसबीजी 997 ही जात सोयाबीन लागवडीच्या क्षेत्रात क्रांती ठरण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील वायगाव-भोयर या गावातील शेतकरी सुरेश गरमडे यांना सोयाबीनच्या नव्या वाणाच्या शोधासाठी स्वामित्व हक्क मिळवले आहेत. एसबीजी 997 नावाच्या सोयाबीन वाणासाठी गेले 12 वर्ष त्यांचे अथक प्रयत्न चालले होते. काही वर्षांपूर्वी स्वतःच्या शेतातील सोयाबीन रोपट्यांमध्ये त्यांना काही रोपटी वेगळी आढळल्याने त्यांचे 10 वर्षे जतन -संवर्धन करत या भरघोस शेंगा असलेल्या वाणाची लागवड केली. या संपूर्ण प्रयत्नांची दखल चंद्रपूर कृषी विभाग- राहुरी कृषी विद्यापीठ व शासनाने वेळोवेळी घेतली होती. पाठपुराव्याअंती अखेर दिल्लीच्या वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने त्यांना हे पेटंट बहाल केले आहे.