गारगोटी चोरणारे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात; ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • 2 years ago
जालना जिल्ह्यातील देऊळगाव रोड वरील वाघरुळ परिसरातील डोंगरामध्ये काही इसम जेसीबीच्या साहाय्याने गारगोटी गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करुन एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गारगोटीचे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तसेच आरोपींकडून ३४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जालना पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी त्यांनी धाड टाकली. परंतु पोलिसांना पाहताच उत्खनन करणाऱ्या इसमांनी पळ काढला. यापैकी नंदकुमार साहेबराव सहारे, ईश्वर रावसाहेब शिंदे, मारोती रामेश्वर शिंदे, प्रभाकर रामप्पा घुले चार आरोपींना पकडले. या आरोपींच्या ताब्यातून एक जेसीबी, एक ट्रॅक्टर, एक स्विफ्ट डिझायर कार, एक ब्रास हिरव्या रंगाची गारगोटी तसेच चार मोबाईलसह एकूण ३४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध जालना पोलीस ठाण्यात कलम ३७९, ३४ भादवि सह ४ व २१ गौण खनिज कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Recommended