Solapur: मानकऱ्यांच्या साक्षीने अक्षता सोहळा संपन्न

  • 3 years ago
सोलापूर : मुखी श्री सिद्धरामय्या... 'हर्र हर्र महादेव, एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'च्या जयघोषाने श्री सिद्धेश्‍वर मंदिर परिसर दुमदुमून गेला. 'दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌...' या संमती वाचनाने तर मानकरी व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. 150 वर्षांपूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा साजरी करण्यात येत होती. यंदा कोरोनामुळे या 150 वर्षांपूर्वीच्या परंपरेचा अवलंब करण्यात आल्याचे दिसून आले.

यंदा कोरोनामुळे मंदिर समिती पदाधिकारी, मानकरी, पुजारी अशा 100 जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांची हिरेहब्बू वाड्यातच सजावट करून सकाळी 9 वाजता विधिवत संक्षिप्त स्वरूपात पूजा करण्यात आली. दत्त चौक, सोन्या मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावरून संबळच्या निनादात फुलांच्या रथात पालखी तर बग्गीत योगदंडाची मिरवणूक काढण्यात आली. संमती कट्ट्यापर्यंत पालखी खांद्यावर घेऊन मानकऱ्यांनी संमती कट्टा येथील श्री उमेश्‍वर लिंगास प्रदक्षिणा घातली. त्यानंतर सुगडीपूजनासाठी सज्ज झाले. त्यापाठोपाठ तलाव परिसरात 11.10 वाजता गंगापूजन, संमतीपूजन करून शंखनादाने परंपरेप्रमाणे तम्मा शेटे यांनी संमतीवाचनास सुरुवात केली. 11.45 वाजता अक्षतासोहळा संपन्न झाला.
(बातमीदार : प्रमिला चोरगी)
#siddheshwar #solapur #solapurnews #siddheshwarmandir #siddheshwarmandir #yogdandyatra

Recommended