मराठी टेलिव्हिजन विश्वात येतेय एक फ्रेश मालिका - देवा शप्पथ | Marathi TV Serial Show News

  • 3 years ago
तो येतोय…आजच्या युगात…आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि देवा शप्पथ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली. देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली देवा शप्पथ ही मालिका वेगळी ठरणार आहे.
देव सर्वव्यापी आहे आणि तो सगळ्यात आहे.आणि तो कोणत्याही माध्यमातून, रूपातून अभिव्यक्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो ही भावना ज्या प्रमाणे असंख्य लोकांच्या मनात आहे त्याच प्रमाणे मी देव मानत नाही , माझी मेहनत , माझे कष्ट यांवर माझा विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही असे मानणारे सुद्धा अनेक आहेत. आपल्याकडे आस्तिक हे संख्येने खूपच जास्त आहेत. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवा या वाहिनीवर सोमवार 20 नोव्हेंबर पासून रात्री 9:30 वाजता अश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या देवाची गोष्ट देवा शप्पथ या मालिकेतून पहायला मिळणार आहे.
या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण उर्फ आजचा क्रिशच्या भूमिकेत क्षितिश दाते आहे तर त्याच बरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण खराडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळ्ये, अभिषेक कुलकर्णी, कौमुदी वालोकर, चैत्राली गुप्ते, आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews