Satara : राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र 'कृष्णा' च्या सभासदांनी उधळून लावले : अतुल भोसले

  • 3 years ago
Satara : राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र 'कृष्णा' च्या सभासदांनी उधळून लावले : अतुल भोसले

Satara (कऱ्हाड) - पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्तारूढ डॉ. सुरेश जयवंतराव भोसले यांच्या सहकार पॅनेलने मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवून कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली. सहकार पॅनेलने प्रत्येक गटात सुमारे दहा हजारांवर मताधिक्याने २१-० अशी आघाडी घेऊन कारखान्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय मिळविला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गट, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे समर्थन मिळालेल्या विरोधी संस्थापक व रयत पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यात त्यांचे पुत्र इंद्रजित मोहिते यांचे पॅनेल तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहे. निकाल जाहीर होताच सहकार पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. यावेळी सहकार पॅनेलचे डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘‘सभासदांनी विश्‍वास दाखवून कारखान्याची एकहाती सत्ता आमच्या हातात दिली. सहा वर्षांत चांगले काम झाले. विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने त्यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. याला मतदारांनी निकालातून उत्तर दिले. यापुढे गटतट बाजूला ठेऊन सर्वांना न्याय्य वागणूक मिळेल, कोणावरही अन्याय होणार नाही.’’ याबराेबरच युवा नेते अतुल भोसले यांनीही सभासदांनी डॉ. सुरेश भोसले यांना प्रामाणिकपणे काम करणारा एक सच्चा माणूस म्हणून उचलून धरले. ‘कृष्णा’च्या संघर्षाच्या राजकारणातील आमचा सर्वात मोठा विजय झाला आहे. अनेक राजकीय लोकांनी कृष्णा कारखान्यात हस्तक्षेप करून राजकीय अड्डा बनवण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सुज्ञ सभासदांनी हा डाव उधळून लावला.’’

video - हेमंत पवार

#atulbhosale #karad #satara

Recommended